सोलापूर, 21 ऑगस्ट: - सोलापूरकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. सोलापूर ते मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर प्रवासी विमान सेवा लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी स्टार एअरला डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून अधिकृत परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर 2025 अखेर या मार्गावर पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज दिली.
यासंदर्भात स्टार एअरने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (MADC) सोबत करार केला असून, विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारी सुरू आहे. लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे आणि प्रवाशांना या नव्या सेवा उपलब्ध होणार आहेत.
औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक आणि पर्यटन विकासाला चालना
या विमानसेवेच्या सुरुवातीमुळे सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मुंबईप्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.
राज्य शासनाची “उडान” योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने या सेवेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत “उडान” योजनेअंतर्गत 14 कोटी रुपयांची व्हायबिलिटी गॅप फंडिंग मंजूर करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे-मुंबई मार्गावर विमानसेवा कार्यान्वित करण्यासाठी शासनाने सक्रिय पावले उचलली आहेत.
#solapurnews #goodnews #airportservice #IASkumarashriwad