सोलापूर : शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर तलावात अलीकडे मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याची गंभीर घटना घडल्यानंतर महापालिकेने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (Dissolved Oxygen - DO) प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची दखल घेत महापौर विनायक कोंड्याल, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाण्याची गुणवत्ता, मृत माशांची स्थिती, स्वच्छता उपाययोजना आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
तातडीच्या उपाययोजना सुरू..
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर पुढील उपाय सुरू करण्यात आले आहेत. तलावातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत सखोल रासायनिक व तांत्रिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. अहवालानंतर पुढील कारवाई होणार..
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ एअरेटर कारंजे तातडीने सुरू करण्यात आले. तलावातील सेंद्रिय घटकांचे विघटन वेगाने व्हावे आणि दुर्गंधी कमी व्हावी यासाठी बायोरेमिडिएशन प्रक्रिया सुरू...
प्रशासनाचे स्पष्ट संकेत..
महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, “सिद्धेश्वर तलाव हे सोलापूरचे नैसर्गिक वैभव आहे. जलचरांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणे ही आमची जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील.”
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, तलावातील पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाईल. आवश्यक असल्यास अतिरिक्त एअरेशन यंत्रणा व तांत्रिक उपाययोजना राबविण्यात येतील. तसेच नागरिकांनी तलाव परिसरात कचरा टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी सहआयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान विभागाचे स्वप्नील सोलंकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे तसेच भारत सरकारचे वॉटर सेफ्टी सल्लागार भूषण देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठरलेली ही घटना सोलापूरकरांसाठी धोक्याची घंटा ठरली असून, तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन अबाधित राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Solapur Municipal Corporation, Solapur Kothe Devendra Rajesh Jaykumar GoreVijay Deshmukh Subhash Deshmukh