मुंबई : रस्ते अपघातांमुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्ते सुरक्षा असोसिएशनचे अध्यक्ष अतुल धुमाळ यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांची मुंबई विमानतळावर भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात रस्ते सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली. महामार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक पथकांची नेमणूक करावी, शाळा व महाविद्यालय परिसरात झेब्रा क्रॉसिंग तसेच सिग्नल उभारावे, अपघातप्रवण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, हेल्मेट व सीटबेल्ट वापर अनिवार्य करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, तसेच रुग्णवाहिकांना प्राधान्य देण्यासाठी विशेष ट्रॅकिंग यंत्रणा उभारावी, अशा मुद्द्यांचा समावेश या निवेदनात आहे.
अध्यक्ष अतुल धुमाळ यांनी भेटीदरम्यान सांगितले की, “प्रत्येक वर्षी हजारो नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. शासनाने योग्य ती ठोस पावले उचलल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल. रस्ते सुरक्षा ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
यावेळी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी या निवेदनाचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आवश्यक ती पावले लवकरच उचलली जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “शासन रस्ते अपघात शून्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरक्षित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”
रस्ते सुरक्षा असोसिएशनने आगामी काळात गावोगावी जनजागृती मोहीमा राबविण्याबरोबरच शाळांमध्ये रस्ता सुरक्षा शपथ कार्यक्रम तसेच वाहनचालकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची घोषणाही केली आहे.
दरम्यान, असोसिएशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये आणि अपघात टाळण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करावे.
या भेटीदरम्यान रस्ते सुरक्षा असोसिएशनचे अतुल धुमाळ, किरण ताकमोगे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
#rtosolapur #pratapsarnik #transportminister #trafficissue