मुंबई : राज्यातील बी.फार्मसी आणि डी.फार्मसी अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा (निकष) एक महिन्याच्या आत पूर्ण कराव्यात, अन्यथा संबंधित संस्थांची प्रवेश प्रक्रिया (प्रथम वर्षासाठी होणारी कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा ठाम इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत २०२२ ते २०२५ या कालावधीत मान्यता प्राप्त बी.फार्म आणि डी.फार्म संस्थांच्या विविध निकष पूर्ततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांकडून आवश्यक प्रयोगशाळा, प्राध्यापकांची संख्या, ग्रंथालय, इमारत व अन्य मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा आणि रोजगारक्षमतेवर याचा परिणाम होत असल्याने शासन या बाबतीत ठोस भूमिका घेत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.