सोलापूर :- दामाणी नगर येथील 1922 साली बांधण्यात आलेला शतकभर जुना रेल्वे पूल 14 डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. या पुलावरील ‘1922’ अशी कोरलेली ऐतिहासिक नोंद असलेला दगड हा सोलापूरच्या नागरी, औद्योगिक व रेल्वे इतिहासाचा महत्वाचा पुरावा आहे. हा वारसा जतन करण्याच्या दृष्टीने गिरीकर्णिका फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
फाउंडेशनचे चेअरमन विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे हा दगड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली. त्यानंतर जाधव आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे सेक्रेटरी डॉ. श्रीकांत अंजुटगी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची भेट घेऊन संपूर्ण विषय मांडला.
या पुढाकारासाठी समाजशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, पुरातत्त्व विभागाचे डॉ. प्रभाकर कोळेकर, प्रा. सचिन शिंदे, प्रा. ज्ञानेश्वरी हजारे तसेच विद्यार्थी अश्विन गोरे यांचे सहकार्य लाभले.
बैठकीदरम्यान कुलगुरू डॉ. महानवर यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना तत्काळ पत्रव्यवहार व रेल्वे अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्यांनी म्हटले की,
“हा दगड विद्यापीठात उपलब्ध झाल्यास इतिहास, पुरातत्त्व आणि वारसा संवर्धन अभ्यासकांसाठी तो अत्यंत मौल्यवान शैक्षणिक वस्तू ठरेल.”
हा दगड विद्यार्थी व संशोधकांना ब्रिटिशकालीन नागरी विकास, रेल्वे इतिहास आणि स्थानिक वारशाचा प्राथमिक पुरावा प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देईल, असेही प्राध्यापकांनी नमूद केले.
#solapuruniversity #1922bridge #old memories #railway