स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शैक्षणिक

वडिलांच्या निधनाच्या दु:खातही धनश्रीची जिद्द; दहावीचा पेपर देऊन दाखवला धैर्याचा आदर्श

वडिलांच्या निधनाच्या दु:खातही धनश्रीची जिद्द; दहावीचा पेपर देऊन दाखवला धैर्याचा आदर्श

सोलापूर : आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातही शिक्षणाची कास न सोडणाऱ्या धनश्री पवार हिच्या जिद्दीने सोलापुरात भावनिक वातावरण निर्माण केले. वडिलांचे पार्थिव घरात असतानाही तिने दहावीचा पहिला पेपर देत धैर्याचा आदर्श घालून दिला. सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशालामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी धनश्री भिकाजी पवार हिचा शुक्रवारी मराठी विषयाचा पहिला पेपर होता. परीक्षेची चांगली तयारी केलेल्या धनश्रीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. सकाळीच तिचे वडील भिकाजी पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना नातेवाईक व शेजारी मोठ्या संख्येने जमले होते.


या घटनेमुळे धनश्रीचा पहिला पेपर बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तिच्या शिक्षणाबाबत वडिलांनी पाहिलेली स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, या भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी धनश्रीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची समजूत काढत अंत्यविधी दोन तास पुढे ढकलण्याची विनंती केली. धनश्रीला धीर देत स्वतः तिला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले.
प्रसंगाची तीव्रता लक्षात घेता पूर्ण तीन तास परीक्षा देणे धनश्रीसाठी शक्य नव्हते. याबाबत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीची दखल घेत केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांना आवश्यक सूचना दिल्या. स्वतः परीक्षा केंद्रावर येऊन त्यांनी धनश्रीला धीर दिला.


धनश्रीने सुमारे दीड तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनाने अंत्यविधीसाठी परत नेले.
अत्यंत वेदनादायी प्रसंगातही शिक्षणाला प्राधान्य देत दाखवलेल्या या जिद्दीमुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचे डोळे पाणावले. धनश्रीच्या धैर्यपूर्ण कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या निर्धाराने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

 

#solapurnews #boardexam #education #motivational

संबंधित बातम्या