स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

धार्मिक

अरणमध्ये रंगला संत सावता माळींचा श्रीफळहंडी सोहळा; हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

अरणमध्ये रंगला संत सावता माळींचा श्रीफळहंडी सोहळा; हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

 

सोलापूर :- माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पारंपरिक श्रीफळहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहुकर महाराज यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या साक्षीने श्रीफळहंडी विधी पार पडला.

या सोहळ्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजीत पाटील, माजी सभापती भारत शिंदे, शिवाजी कांबळे, रमेश बारसकर, सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे आणि मृदुल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात श्रीफळहंडी सोहळा नयनरम्य वातावरणात साकार झाला. पाच हजाराहून अधिक श्रीफळ बांधून तयार करण्यात आलेली हंडी, गिड्डे घराण्याच्या मानाप्रमाणे समारंभपूर्वक पारावर बांधली गेली आणि देहुकर कुटुंबातील बाळासाहेब, बापूसाहेब व कान्होबा देहुकर यांच्या हस्ते ती फोडण्यात आली.

यावेळी संत सावता माळी महाराज आणि श्री विठ्ठल यांची पालखी भेट, पुष्पवृष्टी व महाआरतीसह पार पडली. विठ्ठलाच्या पालखीचे अरण शिवारात जल्लोषात स्वागत झाले. अश्वपूजन, रांगोळ्या व फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भक्तिमय झाले. देहूकर मंडळींनी किर्तन सादर केले, तर स्थानिक भजनी मंडळांनी भजन गायन केले.

महाराष्ट्रभरातून आलेल्या दिंड्या व भाविकांच्या गर्दीत अरण नगरी भक्तिरसात न्हालेली दिसली. संत सावता महाराजांच्या समाधीसमोर पार पडलेला श्रीफळहंडीचा सोहळा हे श्रद्धेचे व भक्तीचे अद्वितीय प्रतीक ठरले. श्रीफळहंडीचे नारळ प्रसादरूपाने मिळविण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

 

 


 

संबंधित बातम्या