वागदरी (ता.अ.कोट) :-अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील जागृत ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थानचा भव्य आणि पारंपरिक रथोत्सव यंदा दिनांक २३ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार रोजी मंदिरासमोर विधीवत ध्वजारोहण करून रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
मंत्रोच्चार, ढोल-ताशांचा निनाद आणि “रक्ष रक्ष परमेश्वर”च्या जयघोषात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. रथोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसर आकर्षक रोषणाई व फुलांनी सजविण्यात आला असून गावातील प्रमुख रस्त्यांवरही सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची, वैद्यकीय मदतीची आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे.
२३ मार्च रोजी मुख्य रथोत्सव सोहळा पार पडणार असून हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात श्री परमेश्वराची भव्य रथयात्रा गावातून काढण्यात येणार आहे. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, वागदरी गाव भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने न्हाऊन निघाले आहे.
#वागदरी #रथोत्सव2026 #यात्रा महोत्सव #श्रीपरमेश्वरदेवस्थान #ग्रामदैवत