सोलापूर | प्रतिनिधी : शिवजन्मोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत यंदा सोलापुरात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. शहरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाने यावर्षी डॉल्बी साउंड न वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, हा शिवप्रेमी आणि नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय मानला जात आहे.
ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व लहान मुलांना होणारा त्रास लक्षात घेता शिवजन्मोत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि सामाजिक भान जपत साजरा करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे. यावर्षी मिरवणुका पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवचरित्रावर आधारित उपक्रमांच्या माध्यमातून साजऱ्या करण्यात येणार आहेत.
या निर्णयाचे सोलापूरचे पोलिस आयुक्तांनी खुलेपणाने कौतुक करत, “कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शहरातील शांततेसाठी हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. इतर सार्वजनिक मंडळांसाठी हा आदर्श ठरेल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या या पुढाकारामुळे सोलापुरात शिवजयंती साजरीकरणाला नवा, जबाबदार आणि आदर्श स्वरूप मिळणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
#solaapur #shivjaynti2026 #solapurcitypolice #shivpremi #nodolbysound