स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

धार्मिक

श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026..प्रशासन व मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026..प्रशासन व मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर प्रतिनिधी:- सोलापूर, शहरात दिनांक 12 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत श्री सिद्धेश्वर महायात्रा होत आहे, यानिमित्त श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्या अनुषंगाने प्रशासन, सोलापूर महानगरपालिका व श्री सिद्धेश्वर मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व ही महायात्रा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.


   नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, श्रीमती विना पवार, सोलापूर शहर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, महायात्रा इन्सीडेंट कमांडर तथा शहर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख तसेच पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


     जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, सोलापूर महानगरपालिका व मंदिर समितीने यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मंदिर परिसर तसेच होम मैदान संपूर्ण सीसीटीव्ही च्या नियंत्रणाखाली असले पाहिजे यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसवून घ्यावेत. पोलीस विभागाने संपूर्ण यात्रा कालावधीत संपूर्ण सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण बिनचूक होऊन भाविकांना कोणत्याही त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.  

   
    मंदिर परिसर, होम मैदान या ठिकाणी जे विविध प्रकारचे स्टॉल लागणार आहेत तसेच मनोरंजनाचे साहित्य उभारले जाणार आहेत त्या सर्वांची तपासणी तसेच फिटनेस सर्टिफिकेट शासकीय यंत्रणेकडून घेण्याची कार्यवाही सोलापूर महानगरपालिकेने करावी. तसेच प्रत्येक स्टॉलला देण्यात येणारे वीज जोडणी याचीही तपासणी विद्युत निरीक्षक यांच्याकडून करून घ्यावी. अग्निशामन दलाने अग्नी प्रतिबंध साहित्य मंदिर व होम मैदान परिसरात ठेवावे तसेच होम मैदानावरील स्टॉल धारकांना याबाबतचे प्रशिक्षण ही द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.


    महापालिका आरोग्य विभागाने मंदिर परिसर व मैदानात आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य पदके वैद्यकीय उपकरण व औषधासह सुसज्ज ठेवाव्यात. ॲम्बुलन्स तसेच आयसीओ सेंटर ही तयार ठेवावेत. वैद्यकीय दृष्ट्या एखादी इमर्जन्सी आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधून त्यादृष्टीने नियोजन आराखडा तयार करावा यासाठी पोलीस विभागाची मदत घ्यावी. तसेच इन्सिडेंट कमांडर यांनी त्यांच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी टू जी सेवा देणारा फीचर फोन खरेदी करावा त्यामुळे संपर्क करण्यास अडथळा येणार नाही. तसेच उप इन्सिडेंट कमांडर म्हणून मंदिर परिसर होम मैदान तसेच प्रदक्षिणा मार्गावर मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. 


    अन्न व औषध प्रशासनाने त्यांनी तयार केलेल्या 9 पथकाच्या माध्यमातून यात्रा कालावधीत होम मैदान तसेच शहराच्या विविध परिसरात लावण्यात आलेल्या फुल स्टॉलची तपासणी करावी. भेसळ करणाऱ्या वर त्वरित कठोर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील तीन बोटी मंदिर समितीकडे साहित्य व मनुष्यबळासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील तलावात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होणार  नाही याची दक्षता घेण्यात येईल. या प्रकारे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदे अंतर्गत यात्रा कालावधीत करावयाच्या विविध उपाय योजनांचा आढावा सोलापूर महानगरपालिका तसेच पंच कमिटी कडून घेतला तसेच आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. 


   प्रारंभी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसेच इन्सिडेंट कमांडर श्रीमती आकुलवार यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पंच कमिटीचे सदस्य यांनी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली.

#सोलापूर #यात्रा2026 #सिद्धेश्वर यात्रा #जिल्हाधिकारी 

संबंधित बातम्या