स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या ‘कॅरी ऑन’ मागणीला समर्थन; उपोषणानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून आश्वासन

विद्यार्थ्यांच्या ‘कॅरी ऑन’ मागणीला समर्थन; उपोषणानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून आश्वासन

सोलापूर (प्रतिनिधी) :-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या न्याय व विधी विभागासह इतर शाखांतील विद्यार्थ्यांनी यंदाही गतवर्षीप्रमाणे ‘कॅरी ऑन’ लागू करावे, या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. शिक्षणाच्या या महत्त्वाच्या विषयावर विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला होता.

‘कॅरी ऑन’ म्हणजेच पूर्वीच्या अपयशातून विद्यार्थ्यांना संधी देणारी योजना, जी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक विद्यार्थी या धोरणावर अवलंबून असतात. मात्र यंदा विद्यापीठाकडून यावर कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्यामुळे, विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गेटवर ठिय्या दिला होता.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, युवासेना कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द यांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांनीच पुढाकार घेत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्याशी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष चर्चा घडवून आणली. ही चर्चा सकारात्मक ठरली असून, कुलगुरूंनी २८ जुलै २०२५ पर्यंत ‘कॅरी ऑन’ धोरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.

कुलगुरूंच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विद्यापीठ परिसरात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. मात्र, जर प्रशासनाने दिलेल्या मुदतीत निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, \"ही मागणी कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही, तर आमच्या शैक्षणिक भविष्यासाठी आहे. प्रशासनाने आमचा आवाज ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा.\"

सुजित खुर्द म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही सतत आवाज उठवत राहू. विद्यापीठ प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर पुन्हा नव्या पद्धतीने आंदोलन छेडले जाईल.” दरम्यान, यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून लवकरच ‘कॅरी ऑन’ संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही अपेक्षा आहे.

 

संबंधित बातम्या