सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निश्चित करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांच्या सूचना व अडचणी जाणून घेण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत मतदान केंद्रांची उपलब्धता, नागरिकांची सोय, प्रवेशयोग्यता, तसेच निवडणूक प्रक्रियेतील व्यावहारिक अडचणी यावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी थेट आणि सविस्तर मते मांडली. प्राप्त सूचनांचा आढावा घेऊन पुढील टप्प्यात पुन्हा स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असे डॉ. ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नातेवाईक महापालिकेत कार्यरत असल्यास त्यांनी प्रचार सभा किंवा कोणत्याही प्रचार प्रक्रियेत सहभागी होता कामा नये. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान केल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
यासोबतच मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक खर्च मर्यादा, जाहिरातींसाठीचे नियम आणि त्यांचे काटेकोर पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने जाहिराती लावू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेबाबत किंवा अन्य तक्रारी असल्यास नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच ‘माय सोलापूर’ अॅपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
ही बैठक शांततेत व सकारात्मक वातावरणात पार पडली. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त गिरीष पंडित यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Solapur Municipal Corporation, Solapur