सोलापूर :- दृष्टीहीन असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर देशाचं नाव उजळवणाऱ्या गंगा कदम यांचा आज सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वचषक जिंकल्यानंतर गंगाचा हा पहिलाच सन्मान सोहळा असल्याने वातावरणात उत्साह आणि अभिमानाची छटा दिसत होती.
महिलांच्या दृष्टिहीन टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या उपकर्णधार म्हणून गंगाने मोलाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीतील 41 धावांची निर्णायक खेळी आणि त्यांच्या ‘007’ जर्सीला साजेशी अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने हा ऐतिहासिक किताब जिंकला.
सत्कार सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबातील सात बहिणींपैकी एक असलेल्या गंगा सध्या दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये MSW चे शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवून आणि राष्ट्रीय संघात उपकर्णधार म्हणून चमकून त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.
गंगाची जिद्द आणि परिश्रम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं, देशाचं नाव उंचावलं,” अशा शब्दांत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी त्यांचा गौरव केला.
CMOMaharashtra
MH 13 NEWS