स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता अंतिम प्रभाग रचना जाहीर

सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता अंतिम प्रभाग रचना जाहीर

सोलापूर :- मा. शासनाचे दि. 14 ऑगस्ट 2025 चे आदेश व मा. राज्य निवडणूक आयोगाचे दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग रचना तयार करण्यात आली होती.

या अनुषंगाने दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. नागरिकांकडून प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी 3 ते 15 सप्टेंबर 2025 असा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत एकूण 38 हरकती प्राप्त झाल्या.

जिल्हाधिकारी यांनी दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणी घेऊन संबंधितांना हरकती व सूचना सादर करण्याची संधी दिली. एकूण प्राप्त हरकतींपैकी 3 हरकती सर्वसाधारण स्वरूपाच्या होत्या तर 35 हरकती प्रभाग रचनेवर परिणाम करणाऱ्या स्वरूपाच्या होत्या.

सुनावणीतील सर्व मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी अंतिम अहवाल नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. राज्य निवडणूक आयोगाने या अहवालाचा सखोल विचार करून प्रारूप प्रभाग रचनेतील एकूण 10 प्रभागांमध्ये (प्रभाग क्र. 6, 10, 11, 12, 14, 15, 16, 19, 20, 21) बदलासह सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मंजूर केली आहे.

प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त 38 हरकतींपैकी राज्य निवडणूक आयोगामार्फत मान्य करण्यात आलेल्या 8 हरकतींच्या अनुषंगाने करण्यात आलेले काही प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत

1️⃣ प्रभाग क्र.-6 मधून लक्ष्मी विष्णू चाळ व एक्झीबीशन हॉल परिसर प्रभाग क्र.-15 मध्ये समाविष्ट.
2️⃣ प्रभाग क्र.-15 मधून मूल्लाबाबा टेकडी, चमनशाह टेकडी परिसर प्रभाग क्र.-14 मध्ये समाविष्ट.
3️⃣ प्रभाग क्र.-14 मधील अश्विनी हॉस्पीटल परिसर प्रभाग क्र.-16 मध्ये समाविष्ट.
4️⃣ प्रभाग क्र.-16 मधील विकास नगर, E.S.I. हॉस्पीटल, इदगाह मैदान परिसर प्रभाग क्र.-21 मध्ये समाविष्ट.
5️⃣ प्रभाग क्र.-21 मधील काही भाग प्रभाग क्र.-20 मध्ये समाविष्ट.
6️⃣ प्रभाग क्र.-20 मधील स्वागत नगर परिसर प्रभाग क्र.-19 मध्ये समाविष्ट.
7️⃣ प्रभाग क्र.-19 मधील विनायक नगर परिसर प्रभाग क्र.-12 मध्ये समाविष्ट.
8️⃣ प्रभाग क्र.-11 मधील कोटा नगर लगत असलेला परिसर प्रभाग क्र.-10 मध्ये समाविष्ट.

राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या अंतिम प्रभाग रचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

संबंधित नकाशे, प्रभागांची यादी व तपशील महानगरपालिका मुख्य कार्यालयातील कौन्सिल हॉल, तसेच क्षेत्रीय कार्यालये येथे आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर
🌐 www.solapurcorporation.gov.in

नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 

आयुक्त
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

#solapurmuncipalcorporation #solapur #smcelection #latestnews

संबंधित बातम्या