स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध – ठेवीदारांमध्ये चिंता, बँक म्हणते लवकरच हटतील बंधने

सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध – ठेवीदारांमध्ये चिंता, बँक म्हणते लवकरच हटतील बंधने

सोलापूर – जिल्ह्यातील नामांकित समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बंध लागू केल्याने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 35(अ) आणि 56 अंतर्गत पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत.

आरबीआयने जारी केलेल्या आदेशानुसार, बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन कर्ज मंजूर करू शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही तसेच कोणतीही मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करू शकणार नाही. याशिवाय ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र, DICGC योजनेअंतर्गत ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यंत ठेव विमा मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर समर्थ सहकारी बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली बाजू मांडत, गेल्या तीन महिन्यांत बँकेने लक्षणीय प्रगती केली असून सभासदांचे भागभांडवल दुप्पटीने वाढले आहे, अशी माहिती दिली. बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी सांगितले की, “बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी आरबीआयच्या सतत संपर्कात असून आम्ही विश्वास व्यक्त करतो की बँकेवरील निर्बंध लवकरच हटवले जातील.”

दरम्यान, ठेवीदार मात्र आपल्या रकमेबाबत अनिश्चिततेत आहेत. काही खातेदारांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, स्थानिक पातळीवरही या घडामोडीने आर्थिक हालचालींना वेग आला आहे. सोलापूरसारख्या औद्योगिक शहरातील या बँकेवरील निर्बंधामुळे सहकारी क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

#samarthbankban #RBI #Bank #breakingupdate

संबंधित बातम्या