बार्शी (शहर प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 692.945 किलो गांजा जप्त केला आहे. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 1 कोटी 60 लाख 58 हजार 900 रुपये इतकी असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बार्शी तालुक्यातील भोयरे गावाजवळ करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. बार्शी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, आगळगाव ते बार्शी रस्त्यावर अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याचा संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH 14 EC 4536 क्रमांकाची कार, MH 14 EM 9833 क्रमांकाचा टेम्पो, आणि MH 43 V 8947 क्रमांकाचा ट्रक या तिन्ही वाहनांची तपासणी केली.
पोलीस थांबण्याचा इशारा करताच कार व ट्रकचे चालक फरार झाले. मात्र, टेम्पो चालक अंकुश दशरथ बांगर (रा. भोयरे, ता. बार्शी) याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. पोलिसांनी पंचनामा करून तीन वाहने व अंमली पदार्थ असा एकूण 1 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात आंतरराज्यीय टोळीचा हात असण्याची शक्यता असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासासाठी तीन पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पो.नि. दिलीप ढेरे, पो.उ.नि. बालाजी वळसने, तसेच पोलीस अंमलदार धनराज केकाण, अभय उंदरे, अरुण डुकळे आदींच्या पथकाने केली. एकूण कारवाईमध्ये 30 हून अधिक पोलिसांचा सहभाग होता.
#crimenews #barshicity #solapurpolice #goodwork