सोलापूर:- सोलापुरातील एका गुंतवणूकदाराची तब्बल 62 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यात आलीय. या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या ग्लेस पर्सी सिक्वेरा याला अखेर अटक करण्यात सोलापूर शहर सायबर क्राईम पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी अहमदाबाद विमानतळावरून पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
सोलापूर शहरातील एका नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 300 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असे आमिष दाखवून आरोपी आणि त्याच्या टोळीने विश्वास संपादन केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास भाग पाडत 62 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करत असताना, ही फसवणूक केवळ स्थानिक नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या सायबर रॅकेटचा भाग असल्याचे उघड झाले. आरोपी ग्लेस पर्सी सिक्वेरा हा गेल्या तीन वर्षांपासून लाओस देशात वास्तव्य करून, तेथून चीन आणि मलेशिया येथील साथीदारांच्या मदतीने सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवत होता.
तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी भारतीय तरुणांना डाटा एन्ट्री, ऑनलाइन जॉब, चांगल्या पगाराचे आमिष दार। परदेशात बोलावून घेत होता. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून, त्यांच्याकडून जबरदस्तीने सायबर फसवणुकीची कामे करून घेतली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने सोलापूर शहर सायबर क्राईम पोलिसांनी आरोपीविरोधात लूकआउट नोटीस जारी केली होती. त्यानुसार भारतात येण्याचा प्रयत्न करत असताना, अहमदाबाद विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.
आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून, आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. आरोपीला सोलापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आरोपीकडून आंतरराष्ट्रीय बँक व्यवहार, डिजिटल वॉलेट, क्रिप्टो व्यवहार, तसेच इतर फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर शहर सायबर क्राईम पोलिसांकडून नागरिकांना ऑनलाइन गुंतवणूक, शेअर मार्केट परताव्याची आमिषे आणि परदेशी नोकरीच्या ऑफर्सबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#solapurcitypolice #cybercrime #dailyviral #cyberpolice