सोलापूर :- शहरातील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडवणाऱ्या सालार टोळीवर अखेर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करत मोठा धडक दिला आहे. मौलाना आझाद चौकात झालेल्या हाणामारी आणि दहशतीच्या घटनेनंतर तपासादरम्यान या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारीचा ठोस पुरावा समोर आल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील असा:
दि. 2 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता, मौलाना आझाद चौक, नई जिंदगी, सोलापूर येथे, सोहेल रमजान सय्यद या तरुणाने आरोपींकडे उसणे दिलेले पैसे परत मागितले असता, त्यावरून सालार टोळीच्या सदस्यांनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. आरोपी फैसल सालार याने चाकू दाखवून धमकी दिली – “मे इधर का भाई हूँ… कोई आगे आया तो खल्लास कर दूंगा!” – असे म्हणत फिर्यादीच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने डाव्या हाताने बचाव केला, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानदारांनी दुकाने बंद केली, नागरिकांनी घरांचे दरवाजे लावून घेतले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात IPC सह विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सालार टोळीचे पृष्ठभूमी:
फैसल सालार, जाफर शेटे, टिपू सालार, पापड्या, अक्रम पैलवान आणि वसीम ऊर्फ मुकरी ही टोळी 2015 पासून सोलापुरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे. खंडणी, खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी, आणि इतर गंभीर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
मोक्काची कठोर कारवाई:
या संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी दिनांक 21 जुलै रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) अंतर्गत कलम 3(1)(ii), 3(2), आणि 3(4) लागू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता या टोळीविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने करत असून, टोळीच्या इतर सदस्यांचा शोधही सुरू.शहरात पोलिसांची मोठी कामगिरी; गुन्हेगारीवर वचक बसणार.