स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

राजकारण

नवीन पीक विमा धोरणावर काँग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जाचक अटी हटवण्याची मागणी

नवीन पीक विमा धोरणावर काँग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जाचक अटी हटवण्याची मागणी

सोलापूर : - राज्य सरकारच्या नव्या पीक विमा धोरणामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझं वाढले असून विमा कंपन्यांना फायदा, तर शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत या धोरणाविरोधात जोरदार निषेध व्यक्त करत निवेदन सादर केले.

निवेदनात पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना प्रती एकर फक्त १ रुपयात विमा कवच देणारी योजना पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. सध्याच्या नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी विम्याचा २%, रब्बी हंगामासाठी १.५% तर व्यापारी पिकांसाठी ५% हप्ता भरावा लागत असून हे अल्पभूधारक व गरिब शेतकऱ्यांसाठी परवडणारे नाही, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.

CCE यंत्रणेवर गंभीर आरोप

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रक्रियेमध्ये पीक कापणी प्रयोग (CCE) ही व्यवस्था अपुरी व अन्यायकारक असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. केवळ निवडक १२ गावांमध्ये CCE होणार असल्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान असूनही त्यांना भरपाई मिळणार नाही. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या घटनांनाही विमा संरक्षण नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

डिजिटल प्रक्रियेमुळे शेतकरी हैराण

नव्या योजनेत शेतकऱ्यांना ‘Farmer ID’, ‘e-Peek’ अ‍ॅप, आधार व बँक खाते यांची लिंकिंग बंधनकारक असून, मोबाईल अ‍ॅपमधील त्रुटीमुळे अनेकांचा विमा रद्द होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी विमा टाळण्यासाठी सात दिवस आधी \'opt-out\' फॉर्म भरावा लागतो, ही प्रक्रिया ग्रामीण व वृद्ध शेतकऱ्यांसाठी अत्यंत क्लिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

70% ट्रिगर पद्धतीवर आक्षेप

विमा भरपाईसाठी ७०% उत्पादन ट्रिगरची अट लावल्यामुळे ३०% पेक्षा कमी नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना एक पैसाही भरपाई मिळत नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात मोठे नुकसान झालेले असले तरीही आकड्यांवर आधारित नियमानुसार भरपाई नाकारली जाते, असे उदाहरण निवेदनात मांडण्यात आले.

शिष्टमंडळात काँग्रेसचे तालुका पदाधिकारी सहभागी

या शिष्टमंडळात मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा अध्यक्ष प्रशांत साळे, उत्तर सोलापूर अध्यक्ष भारत जाधव, अक्कलकोटचे मल्लिकार्जुन पाटील, मंगळवेढा शहर अध्यक्ष राहुल घुले, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, पंढरपूरचे संदीप पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते.

सरकारच्या नव्या धोरणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक अडचणीत येत असून तात्काळ पूर्वीप्रमाणे १ रुपयात पीक विमा योजना पुन्हा लागू करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी काँग्रेसतर्फे देण्यात आला.

Praniti Shinde Indian National Congress

संबंधित बातम्या