Solapur :- सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य, स्थायी समिती आणि परिवहन समितीसाठी इच्छुक असलेल्या नावांची शिफारस शहर भाजपकडून प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे यांच्यासोबत रविवारी सविस्तर चर्चा केली.
महापालिकेच्या नव्या टर्ममधील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत 10 स्वीकृत सदस्य, स्थायी समितीचे 16 आणि परिवहन समितीचे 12 सदस्य निश्चित केले जाणार आहेत.
400 अर्ज, संधी फक्त 9 जणांना..
स्वीकृत सदस्यपदासाठी तब्बल 400 हून अधिक अर्ज भाजपकडे दाखल झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात संधी केवळ 9 जणांनाच मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वासमोर मोठे समीकरण उभे ठाकले आहे. स्थायी आणि परिवहन समितीसाठीही इच्छुकांची रांग मोठी असून, इच्छुकांनी आपल्या-आपल्या ‘राजकीय गॉडफादर’कडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
तीनही आमदार गटांतील नगरसेवकांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असून, पालकमंत्री व शहराध्यक्ष यांनी सुचवलेल्या नावांचाही विचार होणार आहे. अंतिम निर्णयावर मंगळवारी प्रदेश भाजप शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती रोहिणी तडवळकर यांनी दिली.
समाज प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न
स्वीकृत सदस्यांमध्ये जैन, मारवाडी, मराठा, पद्मशाली, लिंगायत आदी समाजांना प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा सुरू आहे. 10 पैकी 9 जागा भाजपच्या वाट्याला, तर 1 जागा एमआयएमकडे जाणार असल्याचे पक्षीय बलाबलातून स्पष्ट होते.
स्वीकृत सदस्यांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत बुधवार, 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत आयुक्त कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
निष्ठावंतांच्या अपेक्षा वाढल्या..
महापालिका निवडणुकीत भाजपने इतर पक्षांतून आलेल्या सुमारे 60 जणांना उमेदवारी दिल्याने पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. आता स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून तरी निष्ठावंतांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
सारांश काय? जागा कमी, इच्छुक जास्त आणि समीकरणे गुंतागुंतीची. त्यामुळे अंतिम यादीत कोणाची ‘एंट्री’ आणि कोणाची ‘वेटिंग’ हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#solapur #solapursmc #politics #dailynewsupdate