पुणे : कोथरूड परिसरात 5 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या शरद हिरामण मोहोळ ऊर्फ भाऊ यांच्या खून प्रकरणात आता मोठी कायदेशीर हालचाल झाली आहे. महाराष्ट्र शासनाने या खटल्यात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली असून, यासंबंधीचा अधिकृत आदेश शासनाच्या वतीने नुकताच काढण्यात आला आहे.
खूनाची पार्श्वभूमी –
शरद मोहोळ यांचा 5 जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच गोळ्या घालून खून करण्यात आला होता. सकाळपासून ऑफिसमध्ये असलेले शरदभाऊ दुपारी 1.15 वाजता दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्यासोबत सागर कडू, पप्पू उत्तेकर, मुन्ना ऊर्फ साहील पोळेकर हे होते. काही अंतर चालल्यावर अचानक फायरिंग सुरू झाले आणि मोहोळ यांच्यावर गोळ्यांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादी अरुण धुमाळ यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पुढे या प्रकरणात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले.
अॅड. प्रदीपसिंग राजपूत – यशस्वी कायदेविषयक वाटचाल
अॅड. राजपूत यांनी आजपर्यंत १०९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दोन आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. तसेच अनेक प्रकरणांमध्ये १ ते २५ वर्षे शिक्षा सुनावण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन व जामीन अर्ज अनेकदा यशस्वीपणे नामंजूर करून घेतले आहेत. याआधीही लातूर जिल्ह्यात विशेष सरकारी वकील म्हणून तसेच पुण्यातील इतर दोन मोक्का प्रकरणांमध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयातही विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या सेवा घेण्यात आलेल्या आहेत.
सदर प्रकरणात अॅड. राजपूत यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि काटेकोर कायदेशीर ज्ञानाचा उपयोग या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून फौजदारी कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अॅड. राजपूत हे गेली ७ वर्षे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत.
समाजातून स्वागत व कौतुक
शरद मोहोळ यांच्या खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांची नियुक्ती झाल्याने समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, या खटल्यात न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.