सोलापूर - सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून ते ९ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण सोलापूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू राहणार आहे.
या कालावधीत शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही प्रकारच्या संमेलनास मनाई करण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड, फटाके आदींचा वापर करण्यास सक्त मनाई राहणार आहे.
दरम्यान, काही कार्यक्रमांना या आदेशातून सवलत देण्यात आली आहे. त्यामध्ये विवाह समारंभ, अंत्यसंस्कार व त्यासंबंधित सभा, कंपन्या, क्लब व सहकारी संस्थांच्या कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे व संस्थांचे दैनंदिन व्यवहार, चित्रपटगृहे, नाटकगृहे व सार्वजनिक करमणुकीचे कार्यक्रम, शासकीय व निमशासकीय कामकाज, न्यायालये व कार्यालयीन संमेलने, शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक उपक्रम, कारखाने, दुकाने व आस्थापनांमधील व्यापारी व्यवहार यांचा समावेश आहे. तसेच विभागीय पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीने होणाऱ्या संमेलनांनाही सूट देण्यात आली आहे.
नागरिकांनी या मनाई आदेशाचे पालन करून शांतता राखावी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी केले आहे.
Solapur Municipal Corporation, Solapur
Solapur City Police