सोलापूर (प्रतिनिधी) : - कार्तिकी वारी यात्रेदरम्यान पंढरपूर आणि अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले असून, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात ड्रोन उडविण्यास संपूर्ण बंदी राहणार आहे.
ही बंदी २७ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील ६० दिवस लागू राहणार असून, त्यादरम्यान कोणत्याही व्यक्तीस या परिसरात ड्रोन उडविण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षाविषयक सूत्रांच्या माहितीनुसार, यात्रेच्या काळात देशविरोधी घटक किंवा दहशतवादी संघटना स्लीपर सेल सक्रीय करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवाना धारक व चालकांनी त्यांच्या ताब्यातील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#solapur #akkalkot #pandhrpur #dronebanned