सोलापूर :- सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात एका रात्रीत तीन घरफोड्या झाल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन आंतरराज्यीय सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण 20 लाख 180 रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घरफोड्यांमध्ये 13.3 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 किलो 804 ग्रॅम चांदीचे दागिने चोरले गेले होते.
पहिल्या घटनेत फिर्यादी सतिश शिवप्पा सोलापूरे यांनी तक्रार नोंदवली होती की, त्यांनी तळमजल्याचे घर कुलूप लावून वर झोपायला गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून 4,87,800 रुपये किंमतीचे दागिने चोरले. त्याच रात्री बी-71, पाटील नगर येथे राहणारे एल. श्रवणकुमार लगुन यांच्या घराचे कुलूप तोडून 19,33,000 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. याशिवाय सौ. पूजा सचिन जाधव यांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता.
सलग तीन घरफोड्या झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. तपास अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे हे गुन्हे रेकॉर्डवरील चोरट्यांनी केल्याची खात्री केली. या दरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कर्नाटकातील दोन आरोपी चोरलेला मुद्देमाल विक्रीसाठी ए.जी. पाटील कॉलेज परिसरात येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून आरोपी राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक (वय 32, रा. कारवार, कर्नाटक) आणि लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक (वय 28, रा. बेळगाव, कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान दोघांच्या ताब्यातून सर्व मुद्देमाल मिळून आला. चौकशीत त्यांनी विजापूर रोड परिसरातील तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी हा मुद्देमाल विजापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पावत्या नसल्यामुळे विक्री न झाल्याने ते सोलापुरात ग्राहक शोधत होते.
दोन्ही आरोपींना विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करून पुढील तपास सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कमी वेळात केलेल्या या कारवाईमुळे सलग तीन घरफोडींचा उलगडा करण्यात यश आले आहे.
#crimenews #solapurpolice #swarjyamarathinews #MRajkumar