सोलापूर :- सोलापूर शहरातील आर.टी.ओ. ऑफिस रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानात तीन अज्ञात इसमांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न केल्याची घटना ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. दुकानातील मालक दिपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांनी आरडा-ओरड करताच आरोपी निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून पसार झाले.
या गंभीर घटनेचा तपास विजापूर नाका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०९(४), ६२, ३५१ (२)(३), ३२४(३), ३(५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राजकुमार, उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील व श्री. राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने सात स्वतंत्र तपास पथके तयार करून सुमारे १२५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी यतीमखाना परिसरात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे —
(१) साहिल दशरथ गायकवाड (२०, रा. लिमयेवाडी),
(२) समर्थ समीर गायकवाड (रा. सुशिल मराठी शाळेजवळ),
(३) सार्थक दशरथ गायकवाड (रा. विठ्ठल मंदिराजवळ) अशी आहेत.
तपासात उघड झाले की साहिल गायकवाड, अजिंक्य चव्हाण (रा. वारजे माळवाडी, पुणे), विशाल जाधव (रा. तुळजापूर), समर्थ गायकवाड, सार्थक गायकवाड, अनिकेत पांडुरंग गायकवाड आणि एक विधिसंघर्षित बालक यांनी मिळून समर्थ ज्वेलर्सवर दरोड्याचा कट रचला होता. अजिंक्य चव्हाण याने वापरलेली अॅक्टीव्हा ओळख पटू नये म्हणून निळ्या रंगाने स्प्रे केली होती.
दरोड्यानंतर आरोपींनी लिमयेवाडीत अॅक्टीव्हाचा रंग पेट्रोलने धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लोखंडी कोयता, दोन मोटारसायकली आणि मोबाईल फोन जप्त केले. प्रमुख आरोपी अनिकेत गायकवाडकडून काळी अॅक्टीव्हा गाडी देखील हस्तगत करण्यात आली.
तपासादरम्यान हेही उघड झाले की आरोपी समर्थ गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होटगी रोडवरील चौधरी फिलिंग सेंटरवर पिस्तुल व चाकूच्या धाकावरून ३९,००० रुपयांची जबरी चोरी केली होती.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे आणि सायबर सेलच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
#solapurpolice #crimebranch #detection #robbery