मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची प्रतिक्षा अखेर संपण्याची शक्यता आहे. आज दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत.
पहिला टप्पा: - राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका प्रथम टप्प्यात घेण्यात येतील. या निवडणुकांची प्रतिक्षा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून, बहुतांश ठिकाणी मुदत संपलेल्या स्थानिक संस्थांचे कामकाज प्रशासकांकडे आहे.
दुसरा टप्पा:- 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडतील. ग्रामीण भागातील या निवडणुकांना मोठे राजकीय महत्त्व असून, सर्व प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
तिसरा टप्पा:- 29 महानगरपालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद यांसारख्या प्रमुख शहरांमधील निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात.
राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना तयारीसाठी सूचनाही दिल्या आहेत.
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आजच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
आगामी काही महिन्यांतील हा राजकीय रणसंग्राम ठरणार असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतराचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#राज्यनिवडणूकआयोग #रणधुमाळी निवडणुकीची# ब्रेकिंग न्युज