मुंबई - राज्यातील महापालिकांच्या (मुंबई वगळून) आगामी निवडणुकांसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे आणि त्या जागांचे संबंधित प्रभागांमध्ये वाटप करण्याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने नुकताच काढला होता. त्यानंतर आता या महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबई वगळून उर्वरित सर्व महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडतीबाबतचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार ही प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर हा असेल.
आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 8 नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर 11 नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल. आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल. प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करण्याची तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर ही असेल.
प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महापालिका आयुक्त अंतिम आरक्षणाबाबत 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत निर्णय घेतील. तर आयोगाच्या मान्यतेनंतर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाईल, असे आयोगाच्या वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
1) आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे :- ३० ऑक्टोबर, २०२५ ते ०४ नोव्हेंबर, २०२५
2) आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे :- ८ नोव्हेंबर, २०२५
3) आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे :- ११ नोव्हेंबर, २०२५
4) प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे :- १७ नोव्हेंबर, २०२५
5) प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक :- २४ नोव्हेंबर, २०२५
6 ) प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी आदेशाच्या परिशिष्ट -11 मधील नमुन्यात निर्णय घेणे :- १ डिसेंबर, २०२५
7) आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे :- २ डिसेंबर, २०२५
#solapur #election2026 #smc zp election #pressconference