सोलापूर – शहरात दिवसा लोकवस्तीतील दोन घरफोडीच्या घटनांमुळे निर्माण झालेली भीती शहर गुन्हे शाखेने अल्पावधीत दूर केली आहे. नवरात्र उत्सव काळात घडलेल्या या गंभीर घरफोडी प्रकरणांमधील दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्या कडून सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 3 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. रेखा कैलास चौधरी (वय 38, व्यवसाय – नोकरी, रा. अंबिका रेसिडेन्सी, कोटणीस नगर, विजापूर रोड, सोलापूर) या ओम डायग्नोस्टिक येथे काम करतात. त्यांचे पती कैलास चौधरी जलसंपदा विभागात नोकरीस आहेत. दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सर्व सदस्य घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले असता, संध्याकाळी 5.30 वाजता त्यांचा मुलगा घरी परतल्यावर घराचे कुलूप तोडलेले आढळले. घरातून साडेचार तोळे सोन्याचे दागिने किंमत 2 लाख 47 हजार रुपये चोरून नेण्यात आले.
तसेच विशाल नगर परिसरातील सौ. पुनम सतिश वांगी (वय 43, रा. ब्लॉक नं.154, विशाल नगर, मेहता स्कूलजवळ, जुळे सोलापूर) या देखील त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता, त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 22 हजार रुपये रोख, 6 ग्रॅम सोन्याची दोन मंगळसुत्रे आणि चांदीचे आरती साहित्य असा 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. या दोन्ही घटनांवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 453/2025, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331(3), 305, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
नवरात्र उत्सव काळात दिवसा घडलेल्या या घरफोडीच्या दोन घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींचा शोध घेत असताना दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी पिंपरी चिंचवड, पुणे येथे आरोपी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय 34, रा. वेताळ नगर, चिंचवड, पुणे) यास अटक करण्यात आली. त्यानंतर दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी दुसरा आरोपी राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय 35, रा. वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) यासही अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींकडून 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागिने व वस्तू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 3 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, तात्या पाटील, बापू साठे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शहर गुन्हे शाखेच्या जलद आणि कुशल तपासामुळे दिवसा झालेल्या घरफोडीच्या दोन्ही घटनांचा छडा लागल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.