सोलापूर :- जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो, असे सांगत तब्बल ₹१ कोटी ८७ लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीचे नाव मोहम्मद कादरसाब शेख (रा. विजापूर, राज्य कर्नाटक) असे असून, त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गोलिबद मल्लिकार्जुन वंगारी (रा. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांना \"गुप्तधनाचा हंडा जमिनीतून काढून देतो\" असे आमिष दाखवून आरोपीने त्यांच्याकडून वेळोवेळी ₹१,८७,३१,३०० इतकी मोठी रोख रक्कम घेतली. यासाठी त्यांना काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा करण्यात आल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.
या प्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५१५/२०२५ नोंदविण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४१७, ४२० तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी विशेष पथक विजापूर येथे पाठवले. तेथे आदिलशाही नगर, जर्मन बेकरी परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून जादूटोण्यासंबंधी साहित्य मिळाले असून, ते पोलिसांनी जप्त केले आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सोलापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणत्याही प्रकारच्या अघोरी प्रथा, जादूटोणा किंवा गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडू नये; आणि अशा फसवणुकीचा अनुभव आल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.