सोलापूर | प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव सज्ज झाले असून, उद्या गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मुंबईकडे ताफा रवाना होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सरकारी सोयी-सवलती मिळाव्यात व यासंदर्भात स्वतंत्र शासन निर्णय (जी.आर.) काढावा, या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईत भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून किमान २५,००० हून अधिक वाहने मुंबईकडे रवाना होतील. यात मोटरसायकल, जीप, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, ॲम्बुलन्स, पाण्याचे टँकर अशा विविध वाहनांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनावर ओळखपट्टीसाठी स्टिकर व भगवे टॉवेल सकल मराठा समाजाच्या वतीने वाटप करण्यात आले आहेत.
यावेळी सर्व समाज बांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईकडे निघणार आहेत. त्यानंतर शहरातील छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर व हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून दुचाकी व चारचाकी ताफा मुंबईकडे प्रयाण करणार आहे.
#manojjarangepatil #marathapower #marathareservstion