सोलापूर(प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभाग, छत्रपती संभाजी महाराज तलाव, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसेच शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. प्रवीण परदेशी (मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्रा) होते.
या बैठकीत महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विकास आराखडा, देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), भुयारी गटारी योजना, अमृत योजना तसेच नगरोत्थान योजनेतील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने STP प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जाणार आहेत. NTPC व DPC कडून निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधीसाठी विविध पर्यायांवर चर्चा झाली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, तैमूर मुलाणी, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि जागतिक बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीनंतर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी सात रस्ता बस डेपो, छत्रपती संभाजी महाराज तलाव, प्राणी संग्रहालय आणि देगाव येथील STP प्लांटची पाहणी केली. त्यानंतर NTPC थर्मल पॉवर प्रकल्पालाही भेट दिली.
संध्याकाळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी दिवसभराच्या चर्चेचा आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित प्रकल्पांना वेळेत पूर्णत्व देत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार या बैठकीतून करण्यात आला.
#solapurmuncipalcorporation #solapur #marathinews