सोलापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ च्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारींवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकोलवार, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक आरोग्य) वेंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांवरील खड्डे आणि प्रलंबित दुरुस्ती कामांवर विशेष भर देत “तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्या,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. काही भागांत घंटागाडी नियमित न फिरणे व कचरा संकलनातील अनियमितता यावरही नाराजी व्यक्त करत स्वच्छता यंत्रणा वेळेत आणि शिस्तीत चालविण्याचे आदेश देण्यात आले.
पाणीपुरवठ्याबाबतही अनेक तक्रारींची दखल घेण्यात आली. निश्चित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करणे, गळती दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आणि अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करणे, असे निर्देश देण्यात आले. ड्रेनेज लाईन तुंबणे, बंद स्ट्रीट लाईट, मोकाट जनावरे, नालेसफाई, डास निर्मूलन फवारणी, उद्यान व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता या मुद्द्यांवरही चर्चा झाली. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे महापौरांनी स्पष्ट केले.
विभागीय अधिकाऱ्यांनी डंपर, जेसीबी, जेटिंग मशीन आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद द्या, विभागीय समन्वय वाढवा आणि सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक व जबाबदारीने द्या, असे आवाहन महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांनी बैठकीत केले.
Solapur Municipal Corporation, Solapur