सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी \"माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर, माझं सोलापूर सुंदर सोलापूर\" या अभियानाचा कृती आराखडा आठ दिवसांत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिले.
महापालिकेच्या मिटिंग हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीस आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेन्द्र कोठे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवि पवार व संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, तैमूर मुलाणी, जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहआयुक्त शशिकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून १५० दिवसांचा कार्यक्रम, आपले सरकार, ई-ऑफिस व RTS डॅशबोर्ड संदर्भातील माहिती दिली. यावेळी पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते महापालिकेच्या तक्रार निवारणासाठी ऑनलाइन वेबसाईट, व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि FAQ Booklet चे प्रकाशन करण्यात आले.
स्वच्छतेच्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी घनकचरा व्यवस्थापन व मोहिमेबाबत सादरीकरण केले. यानंतर पालकमंत्र्यांनी शहरातील मुख्य व उपरस्त्यांची नियमित स्वच्छता, प्रभागनिहाय मोहिमा, शौचालयांचे दुरुस्ती-नूतनीकरण, नवीन शौचालय बांधकाम आणि पाणीपुरवठा योजनांचे (₹८९२ कोटी) कार्यक्षम नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या.
बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन नागरिकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
#solapurmuncipalcorporation #Jaykumargore #solapurcity