स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

सोलापूर महापालिकेत तिरंगा राखी कार्यशाळा; ७५ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर महापालिकेत तिरंगा राखी कार्यशाळा; ७५ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : दीनदयाळ अंत्योदया योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी \"हर घर तिरंगा\" मोहिमेच्या अनुषंगाने तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

महानगरपालिका सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत शहरातील ३० हून अधिक बचत गटांमधील सुमारे ७५ महिलांनी सहभाग घेतला. सक्रीय सदस्यांनी उपस्थित महिलांना प्रत्यक्ष तिरंगा राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

हर घर तिरंगा\' मोहिमेचा उद्देश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाची ही मोहीम नागरिकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे आणि तिरंग्याशी वैयक्तिक नाते जोडणे हा आहे. महाराष्ट्र राज्याने या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली असून यावर्षी (२०२५) २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तीन टप्प्यांमध्ये ती राबवली जात आहे.

कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समुदाय संघटक निता गवळी, सुनिता कोरे, ज्योती शिर्कुल, ज्योती चौगुले, आशिया शेख, तब्बसुम बडेघर तसेच वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शीलाताई वाघमारे यांनी केले तर आभारप्रदर्शन गणेश हजारे यांनी मानले.

 

संबंधित बातम्या