सोलापूर- सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, नाले भरून वाहू लागले व काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच जय मल्हार चौक भागातील एका घराची भिंत कोसळली आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी श्री. शाम कन्ना व अन्य संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली.
बाळे संतोष नगर सदर भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली होती. बाळे ढेपे शाळेच्या समोरील हायवेवरील ब्रिजखाली झाडाची ओंडके, कपडे व इतर कचरा अडकल्यामुळे नाल्याची प्रवाह क्षमता कमी झाली व परिणामी पाण्याची पातळी वाढून परिसरात पाणी साचले.
बाळे राहुल नगर या भागात देखील पाणी शिरल्याची घटना घडली. बाळे पुणे हायवेच्या खालील नवीन ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे नाल्याचे नैसर्गिक वहन अडथळले गेले होते.
प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत पाण्याचा प्रवाह दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या. तसेच कल्पना नगर येथे नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी श्री. आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकाने JCB च्या साहाय्याने तातडीने पाणी निचऱ्याचे काम केले व रहिवाशांना मोठा दिलासा दिला.सोलापूर महापालिकेच्या जेटिंग मशिन्स व रोडिंग टीम २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी तत्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाचा वापर करावा.
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील नालेसफाई पुन्हा एकदा तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागास दिले आहेत.
सर्व विभागांनी समन्वय साधत मान्सून कालावधीत अशा आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले.
नागरिकांना आवाहन :
सोलापूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे सज्ज असून, कोणतीही समस्या आल्यास खालील आपत्ती नियंत्रण केंद्रावर संपर्क साधावा. फोन -- 0217-- 2740335
टोल फ्री नंबर 18002331916