स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

महसूल सप्ताह 2025चा उत्साहात शुभारंभ : नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा निर्धार

महसूल सप्ताह 2025चा उत्साहात शुभारंभ : नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा निर्धार

सोलापूर :- शासनाच्या विविध योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्टदरम्यान ‘महसूल सप्ताह 2025’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज श्री शिवछत्रपती रंगभवन येथे प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

या प्रसंगी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, तसेच महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी सांगितले की, “महसूल सप्ताहाचा उद्देश म्हणजे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जागरूकता निर्माण करणे, नागरिकांचा विश्वास वाढवणे आणि योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.”

या वेळी 2024-25 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 56 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय महसूल कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शासनाच्या  कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सर्वप्रथम महसूल विभागावरच असते. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच प्रशासन सुरळीतपणे चालते.

सप्ताहभर जनहित उपक्रमांची मालिका
या सप्ताहात जिल्हाभरात जनजागृती मोहिमा, योजनांचे लाभ वितरण, माहिती सत्रे, कार्यशाळा आणि नागरिक संवाद कार्यक्रम आयोजित होणार असून पारदर्शकता आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

संबंधित बातम्या