स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर :- महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह 2025 साजरा करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. त्यानुसार सोलापूर महसूल प्रशासनाने 1 ऑगस्ट रोजी रंगभवन येथे महसूल दिन व महसूल सप्ताह शुभारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.

महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा आणि महसूल वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरीता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षीप्रमाणे दिनांक १ ऑगस्ट, २०२५ हा \"महसूल दिन\" म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा. तसेच, यावर्षी महसूल दिनापासून दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यभरात \"महसूल सप्ताह-२०२५\" साजरा करण्यात यावा, असे महसूल विभागाने 29 जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयात सुचित केलेले आहे.

या महसूल सप्ताहामध्ये, प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे विशेष मोहिम,कार्यक्रम,उपक्रम,शिबीरे,महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात यावे.

सोलापूर महसूल प्रशासनामार्फत \"महसूल सप्ताह\" मध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील ,दिनांक, कार्यक्रमाचे स्वरुप:-

१ ऑगस्ट \" महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ\"

\"महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ\"

२ ऑगस्ट \"शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम\"

३ ऑगस्ट \"पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे\"

४ ऑगस्ट \"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे\"

५ ऑगस्ट \"विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे\"

६ ऑगस्ट \"शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे, सरकारजमा करणे) निर्णय घेणे\"

७ ऑगस्ट \"M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ\"

उपरोक्त प्रमाणे 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह निमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम जिल्हा, तालुका स्तरावर महसूल विभागाच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांना संबंधित महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या