मुंबई :- डिजीटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी संवाद माध्यम बनले असले, तरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वापरावर सरकारने आता नव्या अटी लावल्या आहेत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणते नियम पाळावेत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सोशल मीडियावरून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय अधिकारांचा गैरवापर अथवा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ हे सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू राहतील. तसेच, जर कोणाही कर्मचाऱ्याने या नियमांचं उल्लंघन केलं, तर त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
राज्य सरकारकडून हे पाऊल सोशल मीडियावरून होणाऱ्या गैरवर्तन, चुकीच्या माहितीचा प्रसार आणि शासकीय गोपनीयतेच्या भंगाला आळा घालण्यासाठी उचलण्यात आले आहे.