सोलापूर -महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केली. या पाहणीमध्ये नगर अभियंता, स्टोर विभाग, वाहन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, भूमी व मालमत्ता विभाग, मालमत्ता कर विभाग, अभिलेखा व पाल कार्यालय आदी विभागांचा समावेश होता.
या पाहणी दरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी कार्यालयांतील कागदपत्रांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ठोस सूचना दिल्या. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, कार्यालयातील जुन्या कागदपत्रांचे ‘अ ब क ड’ या पद्धतीने वर्गीकरण करावे. या पद्धतीनुसार अत्यावश्यक, उपयुक्त, निष्क्रिय व नष्ट करण्यायोग्य अशा स्वरूपात दस्तावेजांचे वर्गीकरण करण्यात यावे.
विशेषतः ३० वर्षांखालील कागदपत्रांचे स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करावे आणि संबंधित नोंदी संगणकीय स्वरूपात जतन कराव्यात, अशी सूचना त्यांनी दिली. त्यानंतर मूळ कागदपत्रे नियमबद्ध प्रक्रियेनुसार नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमतेत वाढ करणे, जागेचा योग्य वापर करणे आणि दस्तऐवज सहज व जलद उपलब्ध करून देणे असा आहे. आयुक्तांनी यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी वेळेत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.
महानगरपालिकेच्या या कार्यपद्धतीमुळे माहिती व दस्तऐवज व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल आणि नागरिक सेवा अधिक गतिमान व प्रभावी होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगीकर, नगर अभियंता सारिका आकुलवार l,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी, किशोर सातपुते, युवराज गाडेकर यांच्यासह विभागाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#solapur muncipal corporation #solapurcity