▪️आपण आजपर्यंत भटक्या गायीनी प्लास्टिक गिळलेलं ऐकलं असेल. प्लास्टिक गिळतानाचे काही व्हिडीओ देखील पाहिले असतील. मात्र, सोलापुरातील धोत्री गावामध्ये एका विषारी नाग सापाने चक्क एक प्लास्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या सापाला ती प्लास्टिकची पिशवी पचवता आली नाही आणि ती पिशवी सापाच्या गुदद्वाराच्या तोंडाजवळ अडकली असल्याचे सर्पमित्र नागेश बिराजदार, अजित बिराजदार आणि मल्लिकार्जुन हिरोळे यांच्या लक्षात आलं. त्यांनी ती पिशवी अलगदपणे बाहेर ओढून काढून सापाची त्या त्रासातून मुक्तता केली.
सापाने प्लास्टिक पिशवी का गिळली असावी? साप प्लास्टिक खातो का? सापांना प्लास्टिक पचतं का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उभे राहिले आहेत.
▪️सापाने प्लास्टिक पिशवी गिळल्याची सोलापुरातील बहुतेक ही पहिलीच घटना आसावी, पण विषारी नाग जातीच्या या मांसाहारी सापाने प्लास्टिक पिशवी का गिळली असेल असा प्रश्न आमच्यासोबत तुम्हालाही पडलाच असेल.
सापाने गिळलेली पिशवी प्लास्टिकची असल्याने सापाला ती पचवता आली नाही. त्यात ती गुदद्वाराच्या तोंडाशी अडकल्याने या सापाची हालचाल मंदावली होती. त्यामुळे काही दिवसातच या सापाचा मृत्यू झाला असता. मात्र सर्पमित्रांनी प्लास्टिक पिशवी काढली आणि त्याचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना जेवढी थरारक आहे. त्यापेक्षाही जास्त मानवाकडून केला जाणारा प्लास्टिकचा अतिवापर आणि बेजबाबदारी अधोरेखित करणारी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन वस्तू मागवतात त्यात खाण्या पिण्याचे पदार्थ प्लास्टिक पिशवीने रॅप केलेले असतात. आपण पदार्थ काढून घेतो आणि पिशव्या रस्त्यावर टाकतो. त्या पिशव्यांना खाद्य पदार्थांचा वास तसाच राहतो आणि त्या वासामुळे जनावरे पिशव्या खातात.
▪️अशाच पद्धतीने प्लास्टिक बॉटल आणि त्याची झाकणे आपण उघड्यावर फेकतो ज्यामध्ये अडकून अनेक मुके जीव नाहक मरतात हे थांबायला हवं. तरच आपण निसर्गाचा समतोल राखण्यात यशस्वी होऊ शकतो.
साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे, प्लास्टिक हे त्याचे खाद्यच नाही. परंतु त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मांस-मटण किंवा अंड्याचा वास असल्या कारणामुळे त्या नाग सापाने ही प्लास्टिकची पिशवी गिळली असेल.
*-वरद गिरी*
ज्येष्ठ शास्त्रज्ञ व सर्प अभ्यासक
सापाने प्लास्टिक गिळल्याच्या अनेक बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये सापांनी प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या किंवा पाईप्स गिळल्याचे दिसून येते. या घटनांमुळे प्राण्यांवर प्लास्टिक प्रदूषणाचा होणारा घातक परिणाम उघड झाला आहे आणि यामुळे अनेक वन्यजीवांचा जीव धोक्यात आला आहे, तर काही वन्यजीवांना आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि प्लास्टिकच्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे.
*-अजित चौहान*
(अध्यक्ष - वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असो. सोलापूर)
प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला किती मोठं नुकसान पोहोचतं हे अनेकदा आपण वाचत आलोय, पाहत आलोय. आपण सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या रस्त्याकडेला फेकतो, समुद्रात नद्या नाल्यांत फेकून देतो. प्लॅस्टिकच विघटन व्हायला हजारो वर्षे लागतात तेव्हा हे प्लॅस्टिक हळूहळू पर्यावरण आणि इथे राहणाऱ्या अनेक प्राणी पक्षांच्या ऱ्हासाचं कारण ठरत चाललं आहे. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या या चांगल्या सवयीमुळे काही प्रमाणात का होईना पण पर्यावरणाचं मोठं नुकसान टळू शकतं.
*-संतोष धाकपाडे*
(सचिव - वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असो. सोलापूर)