सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन व सुधारणा विषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व विभागीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा संदर्भातील विविध सूचना व आदेश देण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त यांनी स्पष्ट निर्देश दिले की, विभागीय हद्दीत सध्या कार्यरत असलेले सार्वजनिक नळ टप्प्याटप्प्याने बंद करून त्या ठिकाणी संबंधित नागरिकांना वैयक्तिक व ग्रुप (खाजगी) नळ कनेक्शन देण्यात यावे. यामुळे पाणी वाचवण्यास मदत होईल आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.
दूषित पाणीपुरवठा संदर्भात काही भागांतून तक्रारी प्राप्त होत असल्याने अशा तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाणी परीक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. पाणीपुरवठा होणाऱ्या दिवशी पाणी वाया जाऊ नये यासाठी उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला.विभागीय अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन, दर तीन दिवसांनी नियोजित पाणीपुरवठा यशस्वीरीत्या कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्य कार्यालय पाणीपुरवठा विभाग यांचेकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कार्यालये आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी. प्रत्येक विभागीय कार्यालयाने सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडून दिलेल्या सूचनानुसार आपआपल्या हद्दीत पाणी वितरण वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी सूचना देण्यात आली.
शहरातील ड्रेनेज लाईन व चेंबर कव्हरची तपासणी करून अडथळा असल्यास त्वरित दुरुस्ती करावी, अशाही सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
#solapur #SMCsolapur #meeting #SMCcommnishor