स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

शासन

\"जन्मदिनी ना गाजावाजा, जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार\"

\

सोलापूर, ता. ३ ऑक्टोबर — माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव या अतिवृष्टी व पुराने गंभीर बाधित गावांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज भेट दिली. पूर ओसरल्यानंतर या गावांमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेतली आणि नुकसानीचा आढावा घेतला.

या दौऱ्यात पुरामुळे शेतीसह घरांचे, जनावरांचे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. गावांमध्ये रस्ते पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे नियमित वाहने जाऊ शकत नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावांमध्ये प्रवेश केला आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.

पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतांमधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाले असून, काही ठिकाणी जमिनीवरील माती पूर्णपणे वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही स्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

या गावांतील पुरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रशासनाने प्रत्येकी ₹१०,००० रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे. याशिवाय, अन्नधान्य, जेवण, जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी या स्वरूपात आवश्यक मदतीचा पुरवठा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले तसेच तालुकास्तरीय विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे योग्य आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यावर भर दिला जात असून, गरजूंना शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

#solapurnews #collector #inspiration #kumarashriwad

संबंधित बातम्या