राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आणि जीवनहानी झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली की, राज्यातील गंभीर पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून सतत संपर्कात आहे. राज्यातील 15 ते 16 जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात विशेषतः अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्या इशारा पातळी ओलांडल्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नांदेड, लातूर आणि बिदर जिल्ह्यांमध्ये समन्वयातून बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफची एक तुकडी, लष्कराचे पथक आणि पोलीस प्रशासन मदत कार्यात सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून आणखी एक लष्करी तुकडी तातडीने रवाना करण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांत जवळपास 200 मिमी पाऊस पडला असून, आज काही तासांतच 170 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकल सेवा पूर्णपणे बंद नसली तरी काही गाड्या उशिरा धावत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना दुपारनंतर सुट्टी जाहीर करण्यात आली असून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.