सोलापूर :- दक्षिण तालुक्यातील मंद्रूप येथील क्रीडा संकुल आणखी अद्ययावत करण्यासाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
राज्यातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी शासनाकडून सुरुवातीला एक कोटींचा निधी मंजूर होता. मात्र आता नविन शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुल योजना विकास निधी हा 1 कोटी वरुन तब्बल 5 कोटी रुपये इतका करण्यात आला आहे. त्यानुसार दक्षिण तालुक्यास त्यातील 3 कोटी निधीची मान्यता शासनाकडून प्राप्त झाली आहे.यासाठी आमदार सुभाष देशमुख यांचा सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नातून 3 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून 400 मीटर धावन मार्ग, बॅडमिंटन हॉल, जिम्नॅशियम हॉल, मुला-मुलींचे वसतीगृह, बहुउद्देशीय हॉल, प्रेक्षक गॅलरी, ओव्हर हेड वॉटर टॅंक, अंडरग्राउंड वॉटर टँक, स्ट्रीट लाईट, फायर फायटिंग व्यवस्था, अंतर्गत रस्ते आदी कामे होणार आहेत. त्यामुळे मंद्रूप येथील क्रीडा संकुल आता अधिक सोयीसुविधायुक्त होणार आहे. याचा लाभ खेळाडू आणि नागरिकांना होणार आहे.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
चौकट
मंद्रूप येथे असलेले क्रीडा संकुल आता आणखीन सुसज्ज होणार आहे. याचा खेळाडूंना फायदा होणार आहे. यासाठी शासनाकडून तीन कोटींचा निधी मिळाला आहे. या माध्यमातून येथे सोयी सुविधा होणार आहेत.
सुभाष देशमुख, आमदार दक्षिण सोलापूर